बारामती : तालुक्यातील ११६ पाणीवापर संस्थांची वीजबिलाची २ कोटी ७५ लाख ४६ हजार १७८ रुपये एवढी रक्कम थकली आहे. मागील वर्षांपासून राज्य शासनाकडून दिले जाणारे सुमारे २८ लाख रुपये अनुदान अद्याप मिळालेले नसल्याने वीजबिल थकल्याचे शेतकºयांनी सांगितले.बारामती तालुक्यातील ३५ गावांमधील ११६ पाणीवापर संस्थांचे वीजबिल थकले आहे. यांपैकी ६१ पाणीवापर संस्थांचे वीजजोड महावितरणकडून तोडण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षात ४८ पाणीवापर संस्थांचे विजजोड तोडण्यात आले आहेत. तालुक्यातील पाणीवापर संस्थांच्या वीजबिलासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळते. पाणीवापर संस्थांनी वीजबिलाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित पाणीवापर संस्थेला देण्यात येते. मात्र, मागील एका वर्षापासून राज्य शासनाने ५० टक्के अनुदानाची रक्कम पाणीवापर संस्थांना दिलेली नाही. त्यामुळे पाणीवापर संस्था अडचणीत आल्या असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.मागील वर्षीचे अनुदानापोटी असणारे सुमारे २८ लाख रुपये राज्य शासनाकडे थकले आहेत. तसेच, पाणीवापर संस्थांच्या पाणीपट्टीची वसुलीही १०० टक्के होत नाही. तर, काही संस्थांवर अवलंबून असणारी लोकसंख्या जास्त व पाणीपट्टी कमी असल्याने अपेक्षित रक्कम जमा होत नसल्याचेही समोर आले आहे.>अनुदानाची रक्कम जमा कराशासकीय अनुदान व वीजबिलाच्या घोळात तालुक्यातील जनतेचे मात्र हाल होऊ लागले आहेत. पाणीवापर संस्थांचे वीजजोड तोडल्याने अनेक वाड्यावस्त्यांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ तेथील ग्रामस्थांवर आली आहे़ काही पाणीवापर संस्थांना महाविरणकडून हप्ते ठरवून दिले आहेत. त्यामुळे त्यांचे वीजजोड सुरू आहे; मात्र तालुक्यातील ६१ पाणीवापर संस्था पाणी असूनदेखील बिलाची रक्कम भरलेली नसल्याने विजेअभावी बंद आहेत. राज्य शासनाने तातडीने अनुदानाची रक्कम जमा करण्याचीदेखील मागणी समोर येत आहे.
बारामतीतील ६१ पाणी योजना बंद, पाणी असूनही विजेअभावी खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:18 AM