सुदाम विश्वे, निवृत्त कलाशिक्षक
पुणे : उष:काळ हाेता हाेता काळरात्र हाेणे म्हणजे काय? हे ज्यांनी याचि देही याचि डाेळा अनुभवला ताे म्हणजे प्रसंग म्हणजे पानशेत धरणफुटीने पुण्यात घातलेला हाहाकार. या घटनेला शुक्रवारी (दि. १२) ६३ वर्षे पूर्ण हाेत आहेत. याबाबत माझ्या वडिलांनी सांगितलेले कटू अनुभव आजही डाेळ्यासमाेर उभे राहतात. त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षरश: पुणेकर पुरते लुटले गेले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बराेबरच ६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले हाेते. तो दिवस आठवण्याइतका मी मोठा नव्हतो; पण वडीलधाऱ्या मंडळींच्या ताेंडून अनेक वर्षे त्या कटू आठवणी ऐकत ऐकत लहानाचा माेठा झालाे, त्यामुळे ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे.
वडील सांगत हाेते की, पळा... पळा... पाणी आले... पाणी वाढले... अशा आरोळ्या झाल्या आणि एकच हाहाकार उडाला. आम्ही त्यावेळी गणेशपेठ येथे राहत होतो. दगडी नागोबा येथे आमचे घर होते. नागझरी नाल्यातून पाणी थेट तेथील अनेक घरांमध्ये घुसले. आईने धैर्याने आम्हा लहानांना बाहेर काढत मनपाच्या शाळेत आश्रय घेतला. घरातील भांडी, इतर सर्व सामान पुरात वाहून गेले आणि क्षणात हाेत्याचे नव्हते झाले. फक्त घरातील मधला खांब होता त्याला एक कंदील व वडिलांचा फोटो होता तो वाचला होता.
आणखी एक आठवण वडीलधारी मंडळी सांगत असे. ती म्हणजे पुराचे पाणी ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी आले... पाणी आले... अशी आराेळी दिली गेली. लोक सर्व साेडून सैरावैरा पळू लागले. अशा प्रकारे नागरिकांना घाबरून भुरट्या चोरांनी घरातील सामान घेऊन पोबारा केला.
शासनाने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांसाठी बांधलेल्या गोखलेनगर येथे आम्हाला घर दिले. वडिलांनी जिद्दीने पुन्हा संसार उभा केला. आम्हाला शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. पुरामुळे पुण्याचा विस्तार झाला. याच पानशेत पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी गोखलेनगर येथे तीन टेकड्यांच्या मध्ये वसाहत वसवली गेली. हा भाग तसा संपूर्ण जंगलाचा, त्यामुळे सुरुवातीला घराबाहेर पडायलाही भीती वाटायची; पण आज तेच गोखलेनगर पुण्याच्या मध्यवस्तीत मोडते. पुरामुळे आम्ही गोखलेनगर येथे आलो आणि आमचे जीवन समृद्ध झाले, असे असले तरी ताे दिवस आठवला की आजही अंगावर काटा येताे.