पुणे : पालिका प्रशासनाने सल्लागारांवर मेहरबानी दाखवत नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत वाटली आहे. अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे. जर सल्लागारांवर नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी टाकून प्रशासन मोकळे होत असेल तर पालिकेचे अभियंते नेमके काय काम करतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मुख्यसभेमध्ये सल्लागारांवर किती खर्च झाली याची सविस्तर माहिती मागविली होती. जानेवारी 2010 पासून एप्रिल 2019 पर्यंत सल्लागारांवर किती खर्च झाला, कोणत्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्यात आले आणि त्यासाठी किती शुल्क अदा करण्यात आले यासंदर्भात विचारणा केली होती. प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सल्लागारांना आजवर 64 कोटी रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. पथ विभागाकडून सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च सल्लागारावर करण्यात आला आहे. पथ रस्ता रुंदीकरणापासून नविन डीपी रस्ते करणे, उड्डाणपूल, सिमेंट कॉक्रिटीकरण करणे, पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, सायकल आराखडा करणे अशा कामांचा समावेश आहे. ही कामे देताना काही ‘ठराविक’ सल्लागारांना कामे देण्यात आल्याचे दिसत आहे. यासोबतच डेÑनेज विभागाने 14 कोटींचा खर्च सल्लागारांवर केला आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या अकरा गावांचा स्टॉर्म वॉटर आराखडा, मैलापाणी वहन आराखडा अशा कामांसाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. तर प्रकल्प विभागाकडून 10 कोटी 64 लाखांचा खर्च झाला आहे. याविभागानेही प्रामुख्याने उड्डाणपुल आणि नदीवरील पुल बांधण्यासाठी सल्लागावर खर्च केला आहे. पाणी पुरवठा विभागाने साडेचार कोटी तर घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिड कोटींच्या घरात खर्च केला आहे. यातील बरीचशी कामे अजुनही सुरुच आहेत.
पुणे महापालिका सल्लागारांंवर मेहरबान : नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:51 AM
अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देकिरकोळ कामांसाठीही नऊ वर्षात नेमले गेले सल्लागारपथ विभागाकडून सर्वाधिक 33 कोटी 33 लाख रुपयांचा सल्लागारावर खर्च