पुणे : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ३१) शहराला दुपारी दीडनंतर पावसाने झोडपून काढले. पश्चिम पुण्यात पावसाचा जोर जास्त होता. ‘आशय मेजरमेंट’नुसार कोथरूडमध्ये एका तासात तब्बल ६४ मिलिमीटर (मिमी) असा मुसळधार पाऊस झाला. पुण्यातल्या उन्हाळ्याची अखेर पावसानेच झाली.
कोथरूडमध्ये रात्री साडेआठ वाजेपर्यंत ६८.४ पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याआधी दुपारी पावणेचार ते पावणेपाच या एका तासातच ‘आशय मेजरमेन्ट’च्या केंद्रात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे शंतनू पेंढारकर यांनी सांगितले.
कोथरूड, सिंहगड रस्ता, खडकवासला, नगर रस्ता या भागातही धुवांधार पाऊस झाला. तुलनेने कात्रज, आंबेगाव परिसरात हलका पाऊस झाला. सोमवारी रात्री साडेआठपर्यंत शहराच्या विविध भागात मोजला गेलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : शिवाजीनगर १६.६, पाषाण ४०, खडकवासला ३४, कोथरुड ६८.४, वारजे ३५.६ आणि कात्रज २.६.