यवत : पालकमंत्री शेत / पांदण रस्ते योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६५० रस्ते खुले करण्याचे दृष्टिक्षेपात आहे. योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
दौंड तालुक्यात पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ यवत येथे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, मंडल अधिकारी दीपक कोकरे, तलाठी कैलास भाटे, प्रकाश कांबळे, किशोर परदेशी, गौरी दाभाडे, उद्धव गोसावी, मनोज तेलंग, भारिप बहुजन महासंघाचे दौंड तालुका अध्यक्ष उत्तम गायकवाड, आरपीआयचे अनिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, नाथदेव दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, पाणंद रस्ते योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरू शकते. पाणंद रस्ते खुले झाल्यास अनेक रस्त्यांचे वाद संपुष्टात येऊ शकतात. ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून पाणंद रस्ता खुला करण्याबाबत प्रस्ताव आल्यास महसूल विभागाकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून यावर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे.
मात्र या योजनेत त्या गावातील नागरिक, पदाधिकारी, शेतकरी, पोलीस व शासकीय अधिकाऱ्यांचा सहभागदेखील महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील तीन रस्ते खुले केले जात आहेत. जास्तीत जास्त रस्ते योजनेतून खुले झाल्यास रहदारी, शेतमालाची वाहतूक आदी अनेक समस्या यातून सुटणार आहे.
फोटो ओळ :- यवत येथे पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ करताना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील व इतर मान्यवर.