पुणे : पुणे महापालिका प्रशासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याने शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, सर्व नियमावली पूर्ण करणाऱ्या केवळ ६६ शाळांचीच घंटा सोमवारी वाजणार आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेले काही विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सूक आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही काही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून बंद असलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यामुळे शहरातील शाळा सुरू करण्यास पालिका प्रशासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. परंतु, पालिकेच्या परवानगीनंतर येत्या सोमवारपासून शहरातील शाळा सुरू होणार आहेत. त्यात पालिकेच्या ४४ व खासगी २२ शाळांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहेत.
कोरोनानंतर सुरू होणाऱ्या शाळांमध्ये पालकांनी संमती दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा, अशी नियमावली शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे शाळा निर्जंतुकीकरणाबाबत खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने शाळांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. त्यानंतर काही शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
--
पालिका प्रशासनाने ५२९ पैकी २५२ शाळांची पाहणी केली. प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोमवारी ५० ते ६० शाळा सुरू होणार आहेत. सुमारे ८ हजार ५०० विद्यार्थ्यांपैकी ३,२०० विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील सुमारे ३० टक्के विद्यार्थीच सोमवारपासून शाळेत येणार आहेत.
- सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका