मतदान यंत्रातील २ अपवाद वगळता मतदान सुरळीतपणे पार पडले. साडेसात ते साडेअकरा या चार तासाच्या टप्प्यात सुमारे २१ टक्के मतदानाची नोंद उरुळी कांचनमध्ये झाली होती. तर दीड वाजण्याच्या दरम्यान मतदान सुमारे ४१ टक्के वर पोहोचले होते. साडेतीनच्या दरम्यान मतदान आणि ५३ टक्केचा टप्पा ओलांडला होता तर मतदान संपताना म्हणजे साडेपाच वाजता एकूण २५ हजार ४२७ मतदारांपैकी १६ हजार ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६६.११ टक्के मतदान नोंदवले गेले. उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, पैकी प्रभाग क्रमांक चारमधून एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे १६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात आली. यासाठी सुमारे ५५ जण आपले नशीब आजमावत होते. त्यांनी साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या प्रकाराने मतदारांशी संपर्क साधून मतदानात सहभागी होण्यासाठी जोराचा प्रचार व प्रयत्न केला होता. मात्र आजच्या मतदानाची टक्केवारी बघता या मतदारांनी उमेदवारांना आपल्यापासून थोडे दूर ठेवण्याचाच प्रकार घडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आज या ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून ते १८ तारखेलाच उघड होऊन जनतेपुढे येईल. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी स्वतंत्र आघाड्या अथवा युती करून निवडणुका लढवल्या होत्या. मागच्या निवडणुकीचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक लढवत होते त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागून राहिली आहे.
विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेत वय वर्षे शंभरच्या श्रीमती रंभाबाई मारुती कांचन यांनी सहभाग घेऊन आपले मत नोंदवले. तर ७५ वर्षांच्या शालू लोंढे यांनी व्हील चेअरवर येवून मतदानाचा हक्क बजावला. दोन अल्पवयीन मुलांकडून मतदान करून घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार मतदान प्रक्रियेदरम्यान आढळून आला परंतु मतदान प्रतिनिधींद्वारे या दोघांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेत खातरजमा करून या अल्पवयीन मुलांना त्यांची माहिती जमा करून घेऊन सोडून दिले.
मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पोलीस यंत्रणेने म्हणजे ६ अधिकारी ४५ पोलिस कर्मचारी व एसआरपीएफचे जवान यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत मतदान पार पडले. शिंदवणे येथे 85 .54%, वळती येथे 85 टक्के, सोरतापवाडी येथे 75%, भवरापूर 90% असे परिसरातील ग्रामपंचायतीत मतदान झाले. ७५ वर्षांच्या श्रीमती शालू लोंढे यांनी व्हील चेअरवरून येवून मतदान केले.