पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरीटेज वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून ६७ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून भवन विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या शुक्रवारी मान्यता देण्यात आली. डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-१ दर्जाची असून १८६४ साली बांधण्यात आलेली आहे. ही वास्तू स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून याठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, इतिहास तज्ञ व्हि. के. राजवाडे, गोपाळ गणेश आगरकर, भांडारकर संस्थेचे संस्थाचे आर. जी. भांडारकर, गुरुदेव रानडे यासारख्या नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतलेले आहे. ही वास्तू पुरातत्व शास्त्र व भाषा शास्त्र यामध्ये शिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था आहे. या ठिकाणी पीएचडी, एमएचे अध्यापन करण्यासाठी देश-विदेशामधून विद्यार्थी व संशोधक येत असतात. या वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून हा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून सागवानी लाकूड कामातील कलाकुसरीचे काम केले जाणार आहे. तसेच चुन्यातील प्लास्टर करणे, लाकडावरील रंग घासून काढणे, लीड शीट पुरविणे आणि बसविणे, दगडी बांधकामाला वॅकर केमिकल लावणे, जीआय पत्रे पुरविणे आणि बसविणे, लाकूड कामास शेलॅक पॉलिश करणे, दगडी बांधकामाला चुन्याचे पॉईंटींग करणे, अस्तित्वातील दगडी पेव्हिंगला अॅशलर फिनिश देणे, बसाल्ट स्टोन पेव्हिंग करणे, अॅशलर स्टोन कोपींग पुरविणे व लावणे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी भवन विभागाने ७४ लाख ९९ हजारांचे पूर्वगणक पत्रक तयार करण्यात आले होते. यापैकी ६६ लाख ९६ हजार ३६३ रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
डेक्कन कॉलेजसाठी पालिकेकडून ६७ लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 8:54 PM
डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-१ दर्जाची असून १८६४ साली बांधण्यात आलेली आहे...
ठळक मुद्देस्थायीची मान्यता : हेरीटेज वास्तूचे जतन व संवर्धन करणे