पुणे: ‘‘बासरी की सुरोंसे लडाई-झगडे बंद होते है; बासरी का संगीत ऐसा है जिससे सब माहौल प्रसन्न हो जाता है,’’ असा विचार ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केले. ‘‘बासरी ही प्रत्येक मंत्र्यांच्याही घरात वाजली पाहिजे. म्हणजे भांडणतंटे दूर होऊन ‘हार्मनी’ निर्माण होईल,’’ अशीही टिप्पणी त्यांनी केली तेव्हा एकच हशा पिकला.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवारी (ता. ११) सुुरु झाला. याच महोत्सवाचा भाग असलेल्या ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीत महोत्सवास तसेच ‘अंतरंग’ या कार्यक्रमालाही प्रारंभ झाला. यात प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. चौरासिया यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन या मुलाखतीदरम्यान घडले.
बासरी हे संगीतातले पहिले वाद्य आहे, अशी सुरुवात करुन पं. चौरासिया म्हणाले, पंडित पन्नालाल घोष यांना ऐकण्याची संधी मला मिळाली. ते शास्त्रीय वाजवायचे. पण तत्कालीन शास्त्रीय संगीतकारांनी बासरीला पहिल्यांदा फार महत्त्व दिले नव्हते. बासरीची उपेक्षाच करण्यात आली. आता मात्र भजन, गझल, लोकधून, शास्त्रीय संगीत असा बासरीचा सर्वदूर संचार आहे. बासरी हे असे वाद्य आहे ज्यातून योगही साधला जातो, असे ते म्हणाले.
पं. चौरासिया म्हणाले, बासरी वादकाच्या नोकरीसाठी कटक रेडिओ स्टेशनचे पत्र आले. घर सोडून मी जाणार हे कळल्यावर आयुष्यात पहिल्यांदा मी वडिलांना रडताना पाहिले. मी पाच वर्षांचा असतानाच माझी आई मला सोडून गेली. वडील म्हणाले, अरे तुझ्यासाठी मी दुसरे लग्न केले नाही, आणि तू आता मला सोडून निघाला आहेस? पंडित भोलेनाथ यांच्याकडे मी बासरीचे धडे गिरवले. त्यांच्यासारखी बासरी मी अजून ऐकली नाही.
सर्वोत्तम मैफलीची अजून प्रतीक्षा
‘‘सलग अठ्ठावीस वर्षे युरोपात बासरी वादन केले. जगभरच्या दिग्गज वादक, गायकांसोबत बासरी वादन केले. पण मला माझ्या सर्वोत्तम मैफिलीची प्रतीक्षा अजूनही आहे. अजूनही मी ‘सक्सेसफुल’ झालोय असे मला वाटत नाही. शिकण्याची प्रक्रिया माझी रोज चालू आहे,’’ असे वयाची ऐंशी ओलांडलेल्या पं. चौरासिया यांनी सांगितले.