लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १५ व्या वित्त आयोगाचा तिसरा टप्प्याचा अनुबंधित निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्ह्यातील १४०४ ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात ६८ कोटी ४१ लाख ३३ हजार रुपयांचे वाटप केले. सध्या कोविडच्या परिस्थितीमुळे गावांमध्ये विविध उपाययोजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध झाले आहे. कोविडमध्ये ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
याबाबत पानसरे यांनी सांगितले की, वित्त आयोगाबरोबरच ग्रामपंचायतींना मुद्रांक शुल्कचे २६ कोटी २ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायतींना हा निधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, या निधीमुळे कोरोनाकाळात योग्य व्यवस्थापन करणे गावांना शक्य होणार आहे, अशी माहिती पानसरे यांनी दिली. केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळत असताे. २०२०-२१ या आर्थीक वर्षाच्या अनुबंधित ग्रँडच्या तिसऱ्या हप्त्यापोटी १,४०४ ग्रामपंचायतींना ६८ कोटी ४१ लाख ३३ हजारांचा निधी मिळाला. हा निधी लोकसंख्येच्या ९० टक्के व क्षेत्रफळाच्या १० टक्के याप्रमाणे वितरित केला आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांनाही या निधी अंतर्गत ८ कोटी ५५ लाख १७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.