लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणासाठी आलेल्या ६ परदेशी नागरिकांना मॅफेड्रोन, कोकेनची तस्करी केल्याबद्दल अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यात टांझानियाचे चार आणि दोघे युगांडाचे असून तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून १३६ ग्रॅम ८०० मिलीग्रॅम कोकेन, १ किलो १५१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) ५७ हजाराची रोकड, मोबाईल असा तब्बल ६८ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील उंड्री परिसरात भाड्याने घेतलेल्या घरातून अमली पदार्थाची विक्री करत होते.
मनफ्रेड दाऊद मंडा (वय ३०), अनास्टाझिया डेव्हिड (वय २६), हसन अली कासीद (वय ३२, तिघेही रा. टांझानिया), शामिम नंन्दावुला (वय ३०), पर्सी नाईगा (वय २५, दोघे रा. युगांडा), बेका हमीस फॉऊमी (वय ४२, रा. टांझानिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हे परदेशी नागरिक शिक्षण, वैद्यकीय व व्यवसाय व्हिसावर देशात आले. मनफ्रेड हा शिकण्यासाठी आला असून चार वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. इतर साथीदार एक वर्षापासून पुण्यात राहतात. पुण्यातील उंड्री परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले होते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना, उंड्रीतील अतुर हिल्स सोसायटीतून विदेशी नागरिक अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती पोलीस नाईक मनोज साळुंके यांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या सुचनेनूसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक ढेंगळे, कर्मचारी प्रविण शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, योगेश मोहिते यांच्या पथकाने अतुर हिल्समधील रो हाऊस नंबर दोन येथे छापा टाकला. त्यावेळी ६ जणांना ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले.