पुणे : गरजेनुसार वीजवापर करण्यासाठी स्मार्ट प्रीपेड वीजमीटरचा वापर करण्यावर महावितरणने भर देण्याचे ठरवले असून लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्रीफेजच्या एकूण ६८ लाख ३९ हजार ७५२ वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी १ लाख २८ हजार ६२३ वितरण रोहित्रे, वीजवाहिन्यांना येत्या मार्चपासून हे मीटर टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत.
पारंपरिक वीजमीटरच्या प्रणालीमध्ये ६८ लाख ४० हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रीडिंग घेणे, त्यानुसार वीज बिल तयार करणे व बिलांचे वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो, तसेच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे, चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे, मीटर नादुरुस्त होणे तसेच वीज बिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे, अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘वीजग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढाच वीजवापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येईल,’ अशी आशा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी व्यक्त केली.
स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये
वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल. त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाइलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाइलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत संपली तरी वीजपुरवठा सुरू राहील. मात्र, संबंधित ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत रक्कम भरून वीजपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक आहे. भरलेल्या रकमेतून रिचार्ज संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा आहे.