कऱ्हाड : शिक्षण संस्थेला अनिवासी भारतीयांकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची बतावणी करत दोघांनी ६७ लाख ८५ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निरंत वसंतराव पाटील (वय ४६, सध्या रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड, मूळ रा. वाठार) यांनी शुक्रवारी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.मोहन लक्ष्मण दारशेठकर व सुहास विष्णू फडके (रा. पुणे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील निरंत पाटील यांना काही वर्षांपूर्वी शिक्षण संस्था स्थापन करण्याची इच्छा होती. आॅक्टोबर २०१० मध्ये निरंत यांची ओळख पुणे येथील लक्ष्मण दारशेठकर व सुहास फडके यांच्याशी झाली. त्यावेळी दारशेठकर व फडके यांनी ‘शिक्षण संस्था स्थापन करण्यास मदत देतो,’ असे निरंतांना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी दारशेठकर व फडके यांनी निरंत पाटील यांची कऱ्हाड येथे भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन करून ‘तुम्हाला शिक्षण संस्थेसाठी अनिवासी भारतीयांकडून आर्थिक मदत मिळवून देतो. ते तुमच्या शिक्षण संस्थेच्या इमारत बांधकाम व अन्य खर्चासाठी आर्थिक मदत देतील,’ असे सांगितले.६ डिसेंबर २०१० रोजी दारशेठकर व फडके यांनी पाटील यांच्याशी पुन्हा चर्चा करून ‘आर्थिक मदत विदेशी चलनाची असल्याने ती भारतात हस्तांतरित करण्यासाठी खर्च येणार असून, तो तुम्हाला करावा लागले,’ असे सांगितले. त्यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून दोन लाख घेतले. त्यानंतर डिसेंबर २०१० ते आॅगस्ट २०१३ दरम्यानच्या काळात वेळोवेळी वेगवेगळ्या बतावणी करून फडके व दारशेठकर यांनी पुणे येथील त्यांच्या खात्यात निरंत पाटील यांच्याकडून एकूण ६७ लाख ८५ हजार रुपये जमा करून घेतले होते. प्रत्यक्षात मदत न मिळाल्यामुळे पाटील यांनी दारशेठकर व फडके यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यावर त्यांनी ‘बँकेत पैसे जमा असून, प्रक्रिया पूर्ण होताच दोन दिवसांत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील,’ असे सांगितले. मात्र, तसे काहीच घडले नाही. (प्रतिनिधी)उपअधीक्षकांशी चर्चानिरंत पाटील यांनी त्यांचे चुलत भाऊ डॉ. परेश पाटील व राजेश पाटील यांच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन घडला प्रकार त्यांना सांगितला. याबाबत शुक्रवारी निरंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात मोहन दारशेठकर व सुहास फडके यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कऱ्हाडात विदेशी मदतीच्या आमिषाने ६८ लाखांचा गंडा
By admin | Published: April 10, 2015 11:20 PM