पुणे : तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करणे, सातवा वेतन आयोग लागु करावा आदी मागण्यांसाठी बी. जे. वैद्यकीयमहाविद्यालयातील ६९ अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सोमवार (दि. २) पासून बेमुदत रजेवर जाणार आहे.
राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांतील सुमारे ६०० प्राध्यापकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आंदोलनाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व अधिष्ठातांना दिले आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनेक सहाय्यक प्राध्यापक काही वर्षांपासून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून नियमित करण्याची मागणी केली जात आहे. पण शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी १५ व १६ आॅक्टोबरला काळ्या फिती लावुन काम करण्यात आले. अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. पण त्यानंतरही निर्णय न झाल्याने बेमुदत सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.तात्पुरत्या स्वरूपातील सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करणे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देणे आणि कोरोना काळातील केलेल्या रुग्णसेवेबद्दल अतिरिक्त भत्ता देणे या प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. दरम्यान, सध्या ससून रुग्णालयामध्ये कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांचे प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही. पण तरीही काही परिणाम झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.---------