पुणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे. यामुळे पुणे शहरातील सात पुल पाण्याखाली गेले असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे अनेक भागात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाल्याने महादजी शिंदे पुल (डिमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील) वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
शहर आणि परिसरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवार (दि.४) रोजी मुळा-मुठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विर्सग सोडण्यात आला. यामध्ये मुळशी आणि पवना धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात विर्सग सोडण्या आल्याने मुठा नदीच्या पाण्याचा पातळीत प्रचंड वाढ झाली. यामुळे औंध, सांगवी, येरवडा, दापोडी, वडगावशेरी, विश्रांतवाडी यादी भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. मुळा नदीला आलेल्या प्रचंड पूरामुळे सोमवारी (दि.५) रोजी सकाळी महादजी शिंदे पुल (डीमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील), राजीव गांधीपुल (औंधगाव ते डांगेचौक मार्गवरील), जुना सांगवी पुल (स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी, नवी सांगवी मार्गावरील), दापोडी पुल (भाऊ पाटील रोड ते दापोडीगाव मार्गावरील), जुना होळकर पुल (खडकीबाजार ते साप्रस मार्गावरील ) हे पाच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तर मुठा नदीला आलेल्या पूरामुळे डेक्कन येथील भिडे पुल आणि महापालिका भवन समोरील टिळकपुल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या पुलाबरोबरच औंध, सांगवी, वडगावशेरी, येरवडा नदी पात्र, शांतीनगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, पुण्यातील नदी पात्र रस्ता येथील रस्ते जलमय झाले. त्यात शहरामध्ये दिवसभर सततधार पाऊस सुरु असल्याने बहुतेक रस्ते जलमय झाले. यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. सुट्ट्यामुळे वाहतुक सुरळीतसोमवार, मंगळवार शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सर्व शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. तसेच अनेक खाजगी कंपन्या, अस्थापनांनी देखील सुट्टी जाहीर केल्या. तर जिल्ह्याधिका-यांचे आवाहनला प्रतिसाद देत कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे नागरिकांनी काही प्रमाणात टाळले. यामुळे सोमवार असून, देखील शहराची वाहतुक सुरळीत होती.