अवसरी : शिंदेमळा येथील मुक्ताजी चंद्रकांत शिंदे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ११ तोळे सोन्याचे दागिने, रोख २५ हजार रुपये असा एकूण अंदाजे ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. त्याचप्रमाणे वरच्या हिंगेमळा येथे सहा घरफोड्या करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यामध्ये बाबाजी हिंगे यांच्या घरातील लग्नाच्या साड्या व रोख ७ हजार रुपये चोरीला गेले आहेत. एकाच रात्री सात घरफोड्या झाल्याने गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.शिंंदेमळा वस्ती येथील मुक्ताजी शिंंदे व त्यांच्या भावाचे घर आहे. शनिवारी रात्री २ वाजता त्यांचा मुलगा जवाहर शिंंदे हा कंपनीतून घरी आला. तो झोपल्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी शेतातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी व लाकडी कपाट तोडून कपाटातील साड्या व साहित्य पळविले. कपाटाशेजारील दोन लोखंडाच्या पेट्या अज्ञात चोरट्यांनी उचलून घरासमोर शेतात नेऊन तोडल्या. त्यामध्ये ७ तोळे वजनाचे २ मंगळसूत्र, २ नेकेलस, सोन्याचे तोडे, २ नेकलेस, झुमके, सोन्याचे वेल, रोख २५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. मुक्ताजी शिंंदे यांच्या पत्नी मनीषा शिंदे सकाळी उठल्यानंतर त्यांना बंद घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी पती मुक्ताजी शिंंदे तसेच मुलांना उठवले. घरात गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसले दिलीप शिंंदे यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. घाटगे यांना घटनेची माहिती दिली. घाटगे यांनी येऊन पंचनामा केला.
शिंदेमळा परिसरात एकाच रात्रीत ७ घरफोड्या
By admin | Published: July 11, 2016 12:46 AM