बाभूळगाव : लोणी देवकर (ता. इंदापूर) एमआयडीसी येथील वाय. आक्सिस स्ट्रक्चरल स्टिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इंदापूर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी ७ लाख ५५ हजार ७०० रुपये किमतीचा अवैध ऑक्सिजन साठा व मुद्देमाल जप्त केला आहे.
ऑक्सिजन साठा हा संबंधित कंपनीने सिलिंडर टाकीमध्ये साठवणूक केल्याचे प्रथमदर्शिनी स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजन भरलेल्या ५१ सिलिंडर टाक्या व २१ रिकाम्या टाक्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.
पूणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, इंदापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या पथकाने सोमवार दि. २६ एप्रिल रोजी रात्री ८:३० वा. लोणी देवकर एमआयडीसीत कंपनीवर छापा टाकला. छापामारी दरम्यान तपासणीमध्ये सदर कंपनीत वरीलप्रमाणे ऑक्सिजनचा अवैध साठा आढळून आला. सदर बाबत पोलिसांनी चौकशी केली असता, २०२१ या चालू आर्थिक वर्षातील जुलै महिन्यात कंपनीत एकूण १७९ ऑक्सिजन सिलिंडरची आवक झाली आहे. त्यामध्ये एक हजार २५३ क्युबेक मीटर इतका ऑक्सिजन आवक झाल्याचे पोलीस चैकशीत समोर आले आहे.
या कारवाईत इंदापूर पोलिसांनी ७ लाख ५५ हजार ७०० रुपये किमतीचा अवैध ऑक्सिजन साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचेसह बीट अंमलदार दीपक पालखे, मोहम्मद अली मड्डी, अमोल गारुडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
लोणी देवकर (ता. इंदापूर) एमआयडीसी कंपनीत इंदापूर पोलिसांच्या छाप्यात जप्त करण्यात आलेला ऑक्सिजनचा अवैध साठा.
२७०४२०२१-बारामती-०६
————————————————