पुणे : परदेशातील वस्तूंचे आणि तेही लकी ड्रॉ मध्ये बक्षीस लागले याला भुलणाऱ्यांची संख्या कमी नाही. एका २३ वर्षाच्या तरुणाला सायबर चोरट्यांनी अशीच परदेशी मोबाईलची इतकी भुरळ पाडली की, त्याने दीड लाख रुपयांच्या मोबाईलसाठी चक्क सव्वा सात लाख रुपये भरले. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ससाणेनगर येथे राहणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्याला फसविणाऱ्या सायबर चोरट्यांनी यापूर्वी अनेकांना गंडा घातला असून मुंबईतील डोंगरी पोलिसांनी त्यांना दिल्लीहून अटक केली आहे.
मुहम्मद जुबरी, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट, सुरज शर्मा, संजय चव्हाण, कृष्णा नकाशा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ही घटना २० जुलै २०२० पासून सुरु झाली. या तरुणाला मुहम्मद जुबरील याने फोन करुन आमची मुहमंद गॅझेट लि. ही कंपनीत असून ती आयएसओ प्रमाणित आहे. कंपनीचे सर्टिफिकेट व त्याचे कंपनीचे ओळखपत्र त्याने फिर्यादीला व्हाटसअॅप केले. त्यानंतर त्याने फिर्यादीला ११ प्रो मॅक्स हा दीड लाख रुपयांचा आयफोन लकी ड्रामध्ये लागला असल्याचे सांगून त्यासाठी प्रथम २० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तो फोन भारतात आल्याचे कळविले. मात्र, दिल्लीतील कस्टम हाऊसने अडविल्याचे सांगून त्याचे टॅक्स भरावे लागतील़ असून सांगून आणखी पैसे भरायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आरोपींनी त्याला वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरण्यास सांगितले व हे पैसे तुम्हाला परत मिळतील, असे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून या तरुणाने मित्रांकडून, नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन ते सांगतील, त्याप्रमाणे पैसे भरत गेला. त्याने तब्बल ७ लाख २५ हजार रुपये भरल्यानंतरही फोन काही मिळाला नाही.
दरम्यान, डोंगरी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे एक गुन्हा दाखल झाला होता. डोंगरी पोलिसांनी या सायबर चोरट्यांचा माग काढून त्यांना दिल्लीहून अटक केली. त्यानंतर या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक अडागळे अधिक तपास करीत आहेत.