लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: लॉकडाऊनमुळे एसटीच्या पुणे विभागाचे रविवारचे (दि. ११) एका दिवसाचे उत्पन्न ७० लाखांवरून थेट ७ लाखांवर आले. शनिवारीही (दि. १०) पुणे विभागाला फक्त १४ लाख रुपयांची प्राप्ती झाली.
कोरोनाच्या मागील वर्षीच्या टाळेबंदीत एसटी सलग ४ महिने बंद होती. त्यात एसटीचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यानंतर पुणे विभागाने हळुहळू रोज ७० लाख रुपये प्रमाणे प्राप्ती सुरू केली होती. मात्र दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनने पुन्हा त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.
वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी पुणे विभागाच्या १५० गाड्या धावल्या. त्यांनी ३५० फेऱ्या केल्या. १४ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले.
दुसऱ्या दिवशी रविवारी ते आणखी घटले. फक्त ८१ गाड्या धावल्या व त्यांनी ११५ फेऱ्या केल्या. त्यातून पुणे विभागाला फक्त ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा प्रवासही शुक्रवारी रात्री उशिरा स्थानकावर उतरलेले प्रवासी, आधीच आरक्षण केलेले प्रवासी यांच्याकडूनच झाला. लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या एकदम कमी झाली. मुंबईसह अनेक शहरांमधील गाड्या प्रवासी नसल्याने रद्द कराव्या लागल्या अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली. कोरोना आधीच्या काळात पुणे विभागाचे दररोजचे उत्पन्न १ कोटी १० ते २० लाख होते. ते आता एकदम घटले आहे. मागील काही महिने परिस्थिती पूर्ववत होत होती. मात्र, दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा परिणाम झाला. शनिवारी व रविवार अशा सुटीच्या दिवशी प्रवास केला जातो, मात्र एसटी सुरू असूनही नागरिकांनी प्रवास करणे टाळल्यामुळे प्रवासी कमी झाले असे ते म्हणाले.
एसटी पुणे विभागाचे कोरोना आधीचे रोजचे उत्पन्न: १ कोटी २० लाख
कोरोना टाळेबंदीनंतर रोजचे उत्पन्न:७० लाख
वीकेंड लॉकडाऊनमधील उत्पन्न:
शनिवारी: १४ लाख ५० हजार
रविवारी: ७ लाख.
-------///
कोरोना स्थिती: स्रोत- चंद्रकांत घाटगे, कामगार अधिकारी, पुणे विभाग.
पुणे विभागातील एकूण कर्मचारी: ४ हजार ५००
आतापर्यंत कोरोनाबाधित: २९४
बरे झालेले: २५०
सध्या बाधित: ३४
कोरोनामुळे मृत्युमुखी : ८