गावातील गटातटाच्या राजकारणात भांडगावतील निवडणूक कायम चुरशीची होत असते. ग्रामपंचायत हद्दीत वाढलेले आैद्योगिकीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे गावातील महसूल व इतर उत्पन्न वाढल्याने निवडणुकीत मोठी आर्थिक ताकद लावली जात असे. यावेळी मात्र गावातील नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील आले. ग्रामपंचायतीच्या ७ जागा बिनविरोध झाल्या. तर ४ जागांवर एकमत न झाल्याने तेथे आता निवडणूक होणार आहे.
वार्ड क्रमांक १ मध्ये एका जागेवर सिधू शंकर हरपळे, वार्ड क्रमांक २ मध्ये सर्व ३ जागांवर नंदा नवनाथ जाधव, तुषार राजू शेंडगे व रूपाली राहुल खळदकर, वार्ड क्रमांक ३ मध्ये सुनंदा सदाशिव गायकवाड, तर वर क्रमांक ४ मध्ये नीलम संदीप दोरगे व लक्ष्मण बबन काटकर हे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. उरलेल्या ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. चार जागांवर उभे असलेल्या उमेदवारांचा कस लागणार आहे. यातील वार्ड क्रमांक ४ मधील लढत लक्षवेधी असून या एका जागेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे चिरंजीव संतोष दोरगे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र दोरगे व रामदास दोरगे यांच्यात लढत होणार आहे.
चौकट :- भांडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. प्रसंगी एक पाऊल मागे जात गावाच्या हिताचा विचार केला. मात्र ११ पैकी ७ जागा बिनविरोध होऊ शकल्या याचा दिलासा असला तरी उर्वरित चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे याची मोठी खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.