पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी होत आहे. उत्सवाच्या कालावधीत शहरात ७ हजार पोलिसांचा खडा पहारा असेल. पुणे शहरात नोंदणीकृत ३ हजार २४५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत़ शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. २ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ उपायुक्त, ३६ सहायक आयुक्त, २०० पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक मिळून ५२५ अधिकारी तसेच ७ हजार पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलाचे ५०० जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या बंदोबस्तासाठी पोलिसांना साह्य करणार आहेत.बेलबाग चौक, मंडई परिसरात मोठी गर्दी होती. या भागात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाईल लांबवण्याच्या घटना घडतात़ मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवाच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत. लाऊड स्पीकरच्या बाबतीत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.।१,२४७ कॅमेरेशहर तसेच उपनगरांत राज्य शासनाने १,२४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयांचा नियंत्रण कक्ष (कमांड सेंटर) पुणे पोलीस आयुक्तालयात आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून मध्य भागातील महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येईल. काही ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. मांडवाच्या परिसरात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. संशयित व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:59 AM