बारामती : कोरोना काळामध्ये महाविकासआघाडी सरकारने चांगले काम केले. मात्र मोदी सरकारने आपल्या लोकांचे लसीकरण पूर्ण होण्याआधी जगाची वाहवा मिळवण्यासाठी आमच्या हक्काच्या लसी दुसऱ्या देशांना दिल्या. थांबवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. नाहीतर कोणाचेच लसीकरण झाले नसते. जनसामान्यांसाठी काम करण्याची वृत्ती कोणाची आहे हे आता लोकांनी समजून घेतले पाहिजे. सात वर्षांमध्ये भाव वाढ तर झालीच मात्र फसवणूक केली असल्याचा आरोप इंदापूरातून काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आयोजित महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा ही पुणे जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. शुक्रवारी इंदापूर येथील संविधान चौकापासून जनजागरण यात्रा सुरू झाली. त्यानंतर इंदापूर शहरांमधून ही यात्रा मुख्य बाजारपेठेत जाऊन पुढे नगरपालिकेच्या प्रांगणात स्थिरावली. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्ह्या सहप्रभारी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या.
रूपवते म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा नेहमीच जनसामान्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे. काँग्रेसने अनेक योजना राबवल्या. निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना राबवली, ही योजना आज अद्यापि सुरू आहे. गरजू व्यक्तींसाठी रेशन द्वारे भरडधान्य योजना काँग्रेस पक्षाने सुरू केल्या. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही योजना बंद झाली. ही योजना पुन्हा सुरू करण्याची खटपट महाविकास आघाडी सरकार करत आहे. उज्वला फक्त नावाला उज्वला आहे. त्याखाली सर्व अंधार आहे. ना शेतमालाला भाव, ना कोणत्या सोयी सुविधा पद्धतीचा गलथान कारभार सध्या सुरू आहे. त्याच्या विरोधात जनजागरण झालं पाहिजे, म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज गावोगावी फिरत आहे.
पंतप्रधान मोदी यांना इंदापूरच्या चौकात बोलवायचे का?
पंतप्रधान मोदी म्हणाले होते, 'अच्छे दिन आयेंगे मोदीजी को लायेंगे' पंधरा लाख रुपयांचे आमिष दिलं. उलट नोटबंदी करून आमच्या घरातील गरजेसाठी ठेवलेले पैसे काढून बँकेत भरायला लावले. सामान्य नागरिक नोटा बदलण्यासाठी बँकेच्या समोर उभी राहिली. त्यामध्ये अनेकांचा बळी गेला, याचा हिशोब कोण देणार? पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मला पन्नास दिवस द्या मी सर्व व्यवस्थित करतो, नाही तर कोणत्याही चौकात मला जाळून टाका. हे मोदींचे शब्द आहेत. त्यामुळे आता इंदापूरच्या चौकात मोदींना बोलवायचं का? असाही सवाल यावेळी रूपवते यांनी उपस्थित केला.