पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि अश्फाक मकानदार या दोघांमध्ये गेल्या ५ महिन्यात ७० कॉल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही तावरे आणि मकानदार या दोघांनी मिळून काही बेकायदेशीर प्रकार केल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
अश्फाक बाशा मकानदार (३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी) आणि अमर संतोष गायकवाड (२७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यांना मुंबई येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी यापूर्वी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे तर मुलाला वाचवणाऱ्या त्याच्या बापासह, मुलाचे म्हणून स्वतःचे रक्त देणाऱ्या आईला तर चालकाचे अपहरण केल्याप्रकरणात मुलाच्या आजोबाला अटक झाली होती. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस करत असलेल्या तपासात मकानदार याची भूमिका ही पहिल्यापासूनच संशयास्पद आहे. तो अवैध धंद्याशी निगडित असून हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबरोबरच तो अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांसाठी पैसेही गोळा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मकानदार याचा अपघात प्रकरणात देखील महत्त्वाचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तावरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतूनच झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले तर मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या दिवशी रक्ताच्या डीएनए तपासणीसंदर्भातील बातमी पसरली व अल्पवयीन मुलाच्या बापावर अटकेची टांगती तलवार लक्षात घेता मकानदार आणि त्यांच्यातील डील लांबणीवर पडली. दरम्यानच्या काळात मुलाच्या बापाची आणि मकानदारची एका कॅफेत भेटही झाली. याच बैठकीत मकानदारने अल्पवयीन मुलाच्या बापाला तुझ्यावर कारवाई होईल, असे सांगितले. त्यानंतरच मुलाचा बाप संभाजीनगर येथे फरार झाला होता. बापाने डॉ. तावरे यांना कुणामार्फत पैसे दिले, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता. तपासात बापाने अश्फाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरे याला पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पसार झालेल्या अश्फाक आणि अमर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.