लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसाने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुढील दोन दिवसांत अंतिम अहवाल येणार आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईसाठी किमान ७० कोटी रुपयांची गरज असून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर मागील आठवड्यात गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत व ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेतपिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये शेती पिकांचे ३ हजार १८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात तब्बल ९ हजार ९९३ शेतकरी बाधित झाले आहेत. तर ७१७ हेक्टरवरील शेती खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतक-यांचे बांध पुराच्या पाण्यात वाहून गेले असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच अंतिम पंचनामे झाल्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीची आकडेवारीत मोठी वाढ होणार आहे.
पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३२१ घरांची पडझड झाली असून, वेल्हा तालुक्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
-----
जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका प्राथमिक अंदाज
एकूण बाधित गावे : ४२०
एकूण मयत व्यक्ती : ०३
बेपत्ता व्यक्ती : ०१
एकूण मयत पशुधन : ०८
घरांची पडझड : ३२१
बाधित शेतकरी : १००१८