पिंपरी : एचडीबी फायनान्स बँकेच्या पिंपरीतील शाखेमधून सुमारे ७० तोळे सोने चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीचे गज उचकटून आत प्रवेश केला. लॉकरमधील सोन्याच्या दागिन्यांसह इतर रोख रक्कम लंपास केली.पिंपरीतील पुणे-मुंबई महामार्गालगत ज्वेल आॅफ पिंपरी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एचडीबी फायनान्स बँकेचे कार्यालय आहे. नागरिकांचे सोने तारण करून, त्यांना विविध कामांसाठी कर्जपुरवठा करण्यासंबंधीचे दैनंदिन व्यवहार या बँकेतून केले जातात. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील बाथरूमच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटून बँकेत शिरले. लॉकर तोडून विविध प्रकारचे सोन्याचे सुमारे ७० तोळे दागिने व २५ हजारांची रोकड असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांनी बँक उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. बँकेचे व्यवस्थापक निशांत केतकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
बँकेतून ७० तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2016 1:34 AM