लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : मुळशी तालुक्यामधील मोसे खोऱ्यातील अतिदुर्गम भागामधील असलेल्या मौजे तव गावच्या भोवताली असणाऱ्या झकनी, भोरदेव, गिरा व दूधवान या वस्त्यांना नुकतेच म्हणजे स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनंतर या गावात रस्ते मिळाले आहे. रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासाचा वेग वाढला. बहुतांशी सर्व ठिकाणी गावोगावी व वाड्यावस्त्यांवरती मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. परंतु मुळशी तालुक्यातील मोसे खोऱ्यातील दुर्गम भागातील असलेल्या मौजे तव गाव व तेथील वाड्यावस्त्या या अनेक सुखसुविधा व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या होत्या.अतिशय दुर्गम भागात वसलेल्या या गावात वीजही काही दिवसांपूर्वीच पोहचल्यानेही गावे प्रकाशमान झाली आहेत. या वरून हा भाग किती दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असल्याची प्रचिती येते. त्यातच भोवताली असणाऱ्या झकनी, भोरदेव, गिरा व दूधवन या वाड्या डोंगर भागामध्ये वसलेल्या असल्यामुळे आणि त्यांना वाहतुकीसाठी रस्ता नसल्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत होते. त्यात पावसाळ्यामध्ये तर येथील नागरिकांना खूपच मोठी कसरत करावी लागत होती. या वाड्यांवर रस्त्याअभावी दुचाकीसुद्धा जात नव्हती. परंतु आता नुकताच जिल्हा परिषदेच्या फंडामधून या चार वाड्यांना म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षांनंतर या वाड्यांना रस्ते मिळाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जि.प.च्या माध्यमातून पूर्ण झालेल्या या रस्त्याचे काम जवळपास तीन महिने चालले. आता नुकतेच पावसाळ्याच्या तोंडावरती या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. या ठिकाणी रस्ते व्हावेत व ते परिपूर्ण करण्यासाठी माजी जि. प. सदस्य व गटनेते शांताराम इंगवले,माजी सभापती महादेव कोंढरे, लालासाहेब पासलकर,वीरबाजी पासलकर प्रतिष्ठान अध्यक्ष राजाभाऊ पासलकर, तवचे सरपंच पल्लवी लालासो पासलकर, मुळशी बांधकाम विभागाचे अधिकारी के. डी. आरे, महेंद्र कोठारे, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले. या ठिकाणी रस्ते झाल्यामुळे तव गावच्या सरपंच पल्लवी लालासो पासलकर यांचे येथील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.व्यवसायाला मिळणार चालना या वाडीत धनगर समाजातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. येथे दूध व्यवसाय हा चांगल्या प्रमाणात आहे. मात्र रस्त्यांअभावी तो व्यवसाय मोठा किंवा त्याची विक्री व्यवस्थित करता येत नव्हती. त्याचप्रमाणे या ठिकाणी भात, नाचणी, वरदी व बांबू हे पीक या भागात घेतले जाते. नवीन झालेल्या रस्त्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होणार आहे. हे रस्ते पानशेत ते तव असा असणाऱ्या मुख्य रस्त्यापासून झकनी दोन किलोमीटर,भोरदेव तीन किलोमीटर,गिरावस्ती दोन किलोमीटर, झकनी ते दूधवन चार किलोमीटर अशा अंतराचे रस्ते तयार करून ते सर्व रस्ते मुख्य पानशेत ते तव या रस्त्याला जोडलेले आहेत.
७० वर्षांनंतर मोसे खोऱ्याला मिळाले रस्ते
By admin | Published: July 02, 2017 2:06 AM