पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर शेवटच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्यात आल्या. गेल्या १४ दिवसांमध्ये प्रभागरचनेवर ४०० हरकती नोंदविल्या गेल्या होत्या, शेवटच्या दिवशी मात्र एका दिवसात ७०० हरकती प्रशासनाकडे आल्या असून, एकूण हरकतींची संख्या ११०० वर पोहोचली आहे. प्रभागरचनेच्या हद्दीविषयी सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, उर्वरित तक्रारी प्रभागांची नावे व आरक्षण याविषयी आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने ७ आॅक्टोबर रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडणार आहे. त्यासाठी नवीन प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. या प्रभागरचनेबाबत नागरिकांचे काही आक्षेप असल्यास १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज अखेरपर्यंत प्रशासनाकडे आलेल्या हरकतींवर येत्या ४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी घेतली जाणार आहे. प्रशासनाला या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास त्या अभिप्रायांसह हरकती निवडणूक आयोगाकडे पाठविल्या जातील. या हरकतींशी प्रशासन सहमत नसल्यास त्याबाबतचा अभिप्राय हरकतींवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागरचनेमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. नोंदविण्यात आलेल्या हरकतींमधील ८० टक्के हरकती या प्रभागरचनेच्या हद्दींबाबत आहेत, तर उर्वरित २० टक्के हरकती या प्रभागांची नावे, आरक्षण याबाबत आलेल्या आहेत. गोखलेनगर भागातील प्रभागाची रचना पंख्यासारखी करण्यात आल्याने यावर मोठ्या प्रमाणात हरकती आलेल्या आहेत. एकच हरकत घेणारे अनेक अर्ज आले असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. - प्रभागरचना तयार करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला असून, सध्याच्या प्रभागांची मोडतोड करून नवीन प्रभाग तयार करण्यात आल्याची टीका भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्या १२ दिवसांमध्ये केवळ १४० हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर हरकती नोंदविण्यास शेवटचे दोन दिवस उरले असताना मात्र एका दिवसात १८० हरकती नोंदविल्या गेल्या. शेवटच्या दिवशी ७०० हरकती आल्या.हद्द बदलाबाबत १००६, नाव बदलाबाबत ३२, आरक्षण बदलाबाबत १७, हरकती आल्या आहेत़ सर्वाधिक १५८ हरकती प्रभाग क्रमांक ३१मधून तर प्रभाग क्रमांक २७ मधून एकही हरकत आली नाही.
प्रभागरचनेवर ७०० हरकती
By admin | Published: October 26, 2016 5:58 AM