पुणे : लॉकडाऊनच्या कालावधी वाढविल्यानंतर शासनाने अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या गावी पाठविण्यास मंजूरी दिल्यानंतर ९ मेपासून आतापर्यंत पुणे शहरातून तब्बल ६ हजार ९९० कामगार मुळ गावी रवाना झाले आहेत. तर पुणे शहरातील विद्यार्थी, कामगार व इतर अशा २ हजार ६२० नागरिकांना खासगी वाहनाने राज्याच्या विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहेत. कामगाराची नोंदणी करण्यास ३ मेपासून शहरातील पोलीस ठाण्यात सुरुवात करण्यात आली आहे. ५ मे पासून खासगी बसने या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यास सुरुवात झाली. ९ मेपासून पुणे रेल्वे स्टेशनवरुन रेल्वेगाड्याद्वारे कामगारांची पाठवणी सुरु झाली. लखनौला ११३१, प्रयागराज येथे १२००, हरिद्वार येथे १४४, जबलपूर येथे १४५६ नागरिकांची रवानगी करण्यात आली. जोधपूर येथे १४०० कामगार रेल्वेने गेले. अशाप्रकारे गेल्या ४ दिवसात ५ हजार ३३१ कामगार, नागरिक व त्यांची मुले पुण्यातून गावी पाठविण्यात आले आहे़त.या सर्व परप्रांतीयांची नोंदणी करणे, त्यांच्या याद्या करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेणे़ तसेच त्यांच्याशी संपर्क साधून रेल्वेगाडीच्या अगोदर त्यांना शहरातील विविध भागातून पीएमपी बसने फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करुन पुणे रेल्वे स्टेशनला आणण्याचे काम शहर पोलीसदलाने केले़. याबरोबर शहराच्या विविध भागातून खासगी ट्रॅव्हल्स व खासगी वाहनातून आतापर्यंत १ हजार ६५९ परप्रातीयांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. या परप्रांतीयांना प्रवासाचे वेळी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण वगैरे देण्यात आले.. तसेचप्रवासात लागणाऱ्या खाण्याची व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेगाड्यांमधून जाणाऱ्या प्रवाशांना फुड पॅकेट, पाणी बॉटल, तसेच दुध, गुळ ढेप वाटप करण्यात आले. या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी मदत करुन मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करुन दिली.
पोलीस आयुक्त डॉ. के़. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे,नोडल अधिकारी उपायुक्त सारंग आवाड, तसेच पुणे शहरातील पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही कामगिरी पार पाडली आहे.