पुणे : महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकामध्ये मोठी तुट येत असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत एलबीटी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ व्यावसायिकांकडून एलबीटी भरण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने पहिल्यांदाचा त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ७ हजार किरकोळ व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.राज्य शासनाने मार्च अखेर एलबीटी बंद करण्याची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणेचे बंद केले आहे. तसेच बहुतांश व्यावसायिकांनी अद्याप एलबीटीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यापार्श्वभुमीवर एलबीटी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती पालिकेचे एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली.एलबीटी न भरणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी सुरु असतानाच किरकोळ व्यापारी हा कर भरत नसल्याचे प्रशासनाच्या निदशर्नास आले आहे; त्याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने त्यांच्या विरोधात खास मोहिम सुरु केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे, त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात हजार किरकोळ व्यवसायिकांना नोटीसा बजाविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नोटीशी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, त्यानुसार संबधित व्यवसायिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विलास कानडे यांनी सांगितले.
शहरातील ७ हजार व्यावसायिकांना एलबीटी वसुलीसाठी नोटीसा देणार
By admin | Published: December 26, 2014 4:58 AM