लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेतील ७१ नगरसेवकांना गेल्या चार वर्षांत आपल्या प्रभागातील एखाद्या समस्येविषयी, विकासकामासंदर्भात झालेल्या कामात एकही प्रश्न पडला नाही़ त्यामुळे त्यांनी एक चकार शब्दही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काढला नसल्याचे दिसून आले आहे़ सभागृहात एक शब्दही न बोलणाऱ्या ७१ नगरसेवकांसह १६२ नगरसेवकांनी मात्र महापालिकेचा निधी खर्ची पाडण्यात कुठलीही कसर सोडली नाही़ या खर्च करताना सर्वाधिक खर्च हा ड्रेनेज / पावसाळी गटारेविषयक कामांना प्राधान्य देत लोकसेवेची टिमकी मिरवली आहे़
परिवर्तन संस्थेने पुणे महापालिकेतील १६२ नगरसेवकांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च, २०२१ या चार वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा असलेले प्रगतीपुस्तक नुकतेच जाहीर केले आहे़ यात नगरसेवकांनी त्यांच्या हातात असलेल्या ‘स’ यादीतील (नगरसेवकांनी सूचविलेली कामे) कामांमध्ये आपले प्राधान्य दिले आहे़ या चार वर्षांत या माध्यमातून सर्व नगरसेवकांनी मिळून एकूण ९० कोटी ९० लाख ८७ हजार ३२६ रुपये खर्च केले आहेत़ सरासरी ५६ लाख ११ हजार रुपये एवढा खर्च वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येक नगरसेवकाने केला आहे़
-----------------------
या खर्चात प्राधान्य मिळालेली पाच कामे
ड्रेनेज / पावसाळी गटारे विषयक : १५ कोटी ३१ लाख (१६़ ८ टक्के)
ज्यूट / कापडी पिशव्या वाटप : ११ कोटी ५७ लाख (१२़ ७ टक्के)
आपत्ती मदतकार्य / कोविडविषयक : ६ कोटी ५९ लाख (७़ ३ टक्के)
स्वच्छता / राडारोडा उचलणे : ५ कोटी ७१ लाख रुपये (६़ ३ टक्के)
पथदिवे - विद्युतविषयक कामे : ५ कोटी ५२ लाख रुपये (६़ १ टक्के)
------------------
कोविडमध्ये वाटपाचे काम अधिक
आपत्ती मदतकार्य या विषयात पहिल्या तीन वर्षात नगण्य खर्च होता़ मात्र गेल्या वर्षात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, हात धुण्यासाठी साबण वाटप अशा कामांनी आघाडी घेतली व यात १८ कोटी ६ लाख रुपये खर्च झाले़ विशेष म्हणजे यामध्ये कापडी पिशव्यांचे वाटप हे लक्षणीय आहे़
-----------