पुणे : रद्द केल्यानंतरही १ हजार व ५०० रुपयांच्या नोटा करासाठी स्वीकारण्याच्या निर्णयानंतर पालिकेच्या तिजोरीत आजअखेरपर्यंत तब्बल ७१ कोटी रुपयांची भर पडली आहे. सोमवारी एकाच दिवसात सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १५ कोटी ३२ रुपये जमा झाले. नोटा स्वीकारण्याची मुदत वाढविण्याबाबत अधिकृतपणे काहीही कळवले गेले नसल्यामुळे पालिकेची सर्व करभरणा केंद्रे सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. मुदत वाढवण्यात आली, तर पुढेही सर्व कार्यालयांमधून सुटीच्या दिवशीही कर जमा करून घेण्यात येईल, असे ते म्हणाले.केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ११ नोव्हेंबरला सरकारी कराचा भरणा जुन्या नोटांमध्ये स्वीकारण्यात येतील, असा निर्णय घेतला. ही मुदत एकच दिवसाची होती. त्यामुळे ११ नोव्हेंबर या एकाच दिवशी पालिकेत १२ हजार पेक्षा जास्त थकबाकीदारांनी तब्बल ३७ कोटी रुपयांचा भरणा केला. त्यानंतर मुदत वाढविण्यात आली व शनिवारी तसेच रविवारी सुटीच्या दिवशीही अनुक्रमे ७ कोटी ४४ लाख व ८ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली झाली. सोमवारी या नोटा स्वीकारण्याची अखेरची मुदत होती. त्यामुळे सकाळपासूनच थकबाकीदारांनी जुन्या नोटा घेऊन पालिकेच्या करभरणा केंद्रांमध्ये रांगा लावल्या.सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाल्याची माहिती मापारी यांनी दिली. मागील चार दिवसांचे एकूण उत्पन्न आता ७१ कोटी ४४ लाख इतका झाला आहे. शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्याही त्यासाठी रद्द करण्यात आल्या होत्या.
पालिकेच्या महसुलात तब्बल ७१ कोटी वाढ
By admin | Published: November 15, 2016 3:44 AM