लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील ५७ गावांतील २ हजार ५०० शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७१ लाखांचा नुकसानभरपाईचा मदतनिधी पदभार स्वीकारल्यानंतर पंधरवड्यात दिल्याची माहिती हवेलीच्या नवनियुक्त तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली. जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या काळातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची वेगवेगळ्या टप्प्यांतील ही भरपाई होती.
कोलते म्हणाल्या, नागरिकांची कामांसाठी अडवणूक होऊ नये तसेच त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून हवेलीत झिरो पेन्डन्सी राबवणार आहे. जुनी प्रकरणे अवलोकन करून त्यावर तातडीने निर्णय घेणार असून, नवीन प्रकरणे तातडीने निर्गत करण्यासाठी नावीन्यपूर्ण संगणक प्रणाली अवलंबणार असून, त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. चूक दुरुस्तीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कलम १५५ ची प्रकरणे, एनएची प्रकरणे त्याचबरोबर आरटीएस टेबलची काही प्रकरणे यासाठी झिरो पेन्डन्सी राबवून प्रकरणे निर्गत करणेकामी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते आदेश दिलेले आहेत.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावून जुन्या कागदपत्रांचे जतन करून कार्यालयीन स्वच्छतेवर भर दिला आहे. कार्यालयात आलेल्या पत्रास विहित मुदतीत उत्तर देऊन काम तातडीने मार्गी लावण्याचा मानस असल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिली.
शिंदवणे येथे शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश
उरुळीकांचन : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले खाते नंबर महसूल किंवा कृषी खात्याकडे दिले नव्हते. त्यांना मदतीचा धनादेश देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन शिंदवणे येथे केले होते. या वेळी आमदार अशोक पवार, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच मनीषा अण्णासाहेब महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक, अण्णासाहेब महाडिक, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी प्रदीप जवळकर, निवृत्ती गवारे, अर्चना वनवे, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी जी. के. कडलग, कृषी सहायक एस. एम. चव्हाण, राजेंद्र भोसेकर ग्रामविकास अधिकारी डी. आर. पोटे उपस्थित होते.
मागील वर्षी ढगफुटी व अतिवृष्टीमुळे हवेली तालुक्यातील शिंदवणे व वळती गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यासाठी नुकसानभरपाई म्हणून शासनाने सुमारे ४० लाखांची मदत या भागातील शेतकऱ्यांना दिली आहे. यामधील शिंदवणे गावातील शेतकऱ्यांचे १० लाख २६ हजार तसेच वळती गावातील शेतकऱ्यांचे २० लाख २१ हजार १०० रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, तर उरलेल्या ९ लाख २२ हजार रुपयांचे धनादेश तयार करून तलाठ्यांना दिले आहेत. शनिवारी पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण केले.
२८ उरुळी कांचन