पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नादात तिघांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २७) वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पहिल्या घटनेमध्ये आनंदनगर भागात राहणाऱ्या अमित जितेंद्र शाह (वय ४५) यांनी सिंहगड पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २२ नोव्हेंबर ते ३० जानेवारी २०२४ या दरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने शेअर मार्केटिंग शिकण्याच्या बहाण्याने व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी ट्रेनिंग दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे भासविले जात होते. गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना ट्रेडिंगसाठी ॲप डाऊनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी तब्बल ६१ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर सिंहगड पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या प्रकरणामध्ये, मगरपट्टा सिटी परिसरात राहणाऱ्या बालाउपेंद्र हरिप्रसाद कुकलाकुंट (४४) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यानच्या काळात शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले तर नफा मिळवून देतो असे प्रलोभन दाखवून त्यांना ७ लाख ५८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली आहे.
तिसऱ्या घटनेत कोथरूड परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कृष्णन कुमार अशी ओळख सांगून शेअर ट्रेडिंगमध्ये अकाउंट ओपन करून जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २ लाख ६९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, परतावा न देता तक्रारदार महिलेने फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे.