पुणे : निरनिराळ्या गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणाऱ्या व निवडणूक काळात हमखास राडा करणाऱ्या गुंडोबांना निवडणुक काळात रोखण्यासाठी चाकण पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. ५ जणांच्या टोळीवर मोक्का, निवडणूक कालावधीत ४ जणांच्या तडीपारीसह सुमारे २० गावांमधील ७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून या भागात परवाना असलेली ४३ शस्त्रही जमा करण्यात आली आहेत. मागील आठवडाभरात भूमिगत झालेल्या काही रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना समन्स व वॉरंट बजावण्यात येत आहेत.यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. चाकण परिसरात ४५ जणांकडे शस्त्रपरवाना आहे. यामधील ४३ जणांची शस्त्रे जमा करून घेण्यात आली असून उर्वरित दोघांना या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नारायण दाभाडेसह पाच जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली असून ४ जणांना निवडणूक कालावधीत १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान तडीपार करण्यात येणार आहे. सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तर सी.आर.पी.सी. ११० प्रमाणे २४ जणांपैकी १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चाकण पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चाकणमध्ये ७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Published: February 16, 2017 2:41 AM