पुणे :पायी जात असताना मोटारसायकलवरील चोरट्याने ७१ वर्षाच्या आजींच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, सावध असलेल्या महिलेने चोरट्याचा प्रतिकार केल्याने त्याने मोटारसायकल सोडून पळून जावे लागले. ही घटना बिबवेवाडीतील लोकेश सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शालिनी शरद तिसगावकर (वय ७१, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शनिवारी रात्री सोसायटीच्या आवारात फिरायला गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना मोटारसायकलवरील एका तरुणाने त्यांना थांबवून पत्ता विचारला. त्याला पत्ता सांगत असताना त्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसुत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या तिसगावकर यांनी त्यांची सोनसाखळी पकडून आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून तेथील नितेश हा तरुण धावत आला. झटापटीत चोरटा मोटारसायकलवरुन पडला. गाडी टाकून तो पळून जाऊ लागला. त्याच्यामागोमाग नितेश चोर चोर म्हणत पाठलाग करु लागला. तेव्हा सोसायटीतील तीन तरुणांनी या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने हातातील हेल्मेट त्यांच्या अंगावर फेकून पळ काढला. फिर्यादी यांच्या गळ्यातील अर्धी सोनसाखळी व मंगळसुत्र असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटा पळून गेला. पोलिसांनी मोटारसायकल व हेल्मेट जप्त केले असून पोलीस उपनिरीक्षक किरण देशमुख अधिक तपास करीत आहेत.