चासकमान - खेडसह शिरूर तालुक्याचे वरदान ठरलेल्या चासकमान धरणामध्ये ७.११ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, सध्या मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५४ मिलिमीटर, तर मागील २४ तासांत दोन मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरून जानेवारी महिन्यापर्यंत धरणामध्ये पाणीसाठा टिकून राहिला होता. तर, खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामातील दोन आवर्तने व दोन उन्हाळी हंगामातील आवर्तने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आली होती.उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनाला जोडूनच दुसरे आवर्तन चालू ठेवल्याने शेतकºयांच्या उन्हाळी हंगामातील भुईमूग, बाजरी, मका यासह विविध पिकांना फायदा झाला. अनेक गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजनांना फायदा होऊन ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत चालू होता.सध्या धरणात ७.११ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी ७३१.१८ मीटर आहे. एकूण साठा ४२.४४ दलघमी, तर उपयुक्त साठा १५.२५ दलघमी आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
चासकमान धरणात ७.११ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:38 AM