पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढल्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील सर्वच भागातील पाणी पिण्यास किती योग्य आहे, याची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासले असून, त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची बाब समाेर आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पुणे शहरात जानेवारी महिन्यात ‘जीबीएस’ या दुर्मीळ आजाराचा उद्रेक झाला होता. यामुळे शहरातील विविध भागांतील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत शोधण्यात येत आहे. यात खडकवासला धरण, खासगी विहिरी आणि खासगी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांसह टँकरच्या पाण्याचा समावेश आहे. हा स्त्रोत शोधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. हे नमुने महापालिकेचे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. आतापर्यंत ७ हजार १९५ पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यामधील १३८ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत.
‘जीबीएस’चे सर्वाधिक रुग्ण पुण्यात
राज्यात आतापर्यंत २२४ ‘जीबीएस’चे रुग्ण सापडले आहेत. त्यातील १९५ रुग्णांवर निदान झाले आहे. तर राज्यभरात १७८ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ‘जीबीएस’मुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळले आहेत. यामध्ये पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांत ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ३३, तर पुणे ग्रामीण भागात ३६ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.दूषित पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जिवाणू आढळून येत आहेत. ज्या भागात पाणी दूषित आढळले, त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात येत आहेत.- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका