पुणे : कॅनडात नोकरी लावून देतो, या आमिषाने एका युवकाची १ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्लोबल ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सव्हिसेस या कंपनीच्या संचालकांविरोधात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्षित गौतमभाई पटेल (रा. बडोदा) आणि रूबीकुमारी सुशीलकुमार पोद्दार (रा. विमाननगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अमित विजय सरोदे (वय ३२,रा. मंगळवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सरोदे यांनी परदेशात नोकरी मिळवण्यासाठी एका संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर आरोपी पटेल आणि पोद्दार यांनी सरोदे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कॅनडात नोकरीची संधी आहे. विमान खर्च, नोंदणी शुल्क, वैद्याकीय तपासणी तसेच व्हिसा शुल्कापोटी एकूण मिळून १ लाख ६६ हजार रुपये भरावे लागतील, असे आरोपींनी सरोदेंना सांगितले. त्यानंतर सरोदे यांना कंपनीत नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र तसेच कॅनडा सरकारचे बनावट पत्र दिले. दरम्यान, नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर पटेल आणि पोद्दार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरोदे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सरोदे, त्यांचा मित्र यांच्यासह ७२ जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप तपास करत आहेत.
---
नोकरीची पडते भुरळ
अनेकदा विविध कारणांवरून तरूणांची फसवणूक केली जाते. बेरोजगार असणाऱ्यांना नोकरीचे आमिष दाखवले की, कुठूनही पैसे जमा करून ते संबंधितांना देतात. त्यामध्ये कोण खरा कोण खोटा हे तपासले जात नाही. त्यांच्यासमोर नोकरी मिळेल, हीच आशा असते. पण पैसे घेतल्यानंतर सतत पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळते.