अशोक खरात
खोडद : गड - किल्ल्यांची सफर करण्याकडे तरुणांबरोबरच ज्येष्ठांचा कलही वाढू लागला आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती गड किल्ल्यांची सफर करू शकते. त्यासाठी वयाची अट नव्हे फक्त मनाची तयारी आणि इच्छाशक्ती असायला हवी. असेच जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील एका ७२ वर्षांच्या आजीबाईंनी करून दाखवले आहे. आजींनी जुन्नर तालुक्यातील अत्यंत कठीण मानला जाणारा किल्ले जीवधन नुकताच अवघ्या दीड तासांत सर केला आहे. या वयात त्यांनी केलेल्या या साहसाबद्दल या त्यांचे कौतूक होत आहे. बबुबाई गेनभाऊ खरमाळे असे या आजींचे नाव आहे.
खरं तर जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांमध्ये सर्वाधिक कठीण किल्ला म्हणून जीवधन ओळखला जातो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत कुठे तरी फिरायला जावं. म्हणून खोडद येथील मोहन खरमाळे यांनी किल्ले जीवधनची निवड केली. घरातील जवळपास मंडळी तयार झाली, विशेष म्हणजे ७२ वर्षांच्या बबुबाई खरमाळे यांनी देखील तयारी दाखवली. किल्ले जीवधन वर येण्याची त्यांची इच्छा पाहून घरातील इतरांना आनंदही झाला आणि भीतीही वाटली.
साधारणपणे ५० ते ६० वर्षे वयापुढील जेष्ठांना विविध आजारांनी ग्रासलेले असते. अनेक जेष्ठ नागरिक व्यायाम करताना आपण पाहतो. कष्टांच्या कामांमुळे या आजीबाई अत्यंत काटक आहेत. या वयातही त्यांना मधुमेह नाही की रक्तदाबाचा त्रास नाही. तरुणाईला लाजवणारा बबुबाई खरमाळे यांचा हा उत्साह कौतुकास्पद आहे.