पुणे - दिवस १५ आॅगस्ट २०१८, वेळ : सकाळी ८ वाजता, ठिकाण : गरुड गणपती चौक, पुणे. ध्वजवंदन करण्याची तयारी पूर्ण झालेली. गरुड गणपतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या रांगोळ्या घालून ध्वजस्तंभ सजवला होता. अचानक दोन व्यक्ती आल्या. त्यांना बघून अनेक जण थांबले. पण कोणाकडेही लक्ष न देता त्या दोघींनी थेट ध्वजवंदन केलं आणि आयुष्यातला परमोच्च क्षण अनुभवला.या दोन व्यक्ती होत्या पुण्यातील तृतीयपंथीयांच्या गुरू पन्नागुरु आणि तृतीयपंथी चांदणी गोरे. या दोघींच्या हस्ते काल गरुड गणपती मंडळाने ध्वजवंदन केले. समाजव्यवस्थेने अजूनही ज्यांना पूर्ण स्वीकारलेले नाही अशा तृतीयपंथीयांच्या हस्ते गरुड गणपती ट्रस्टने केलेले ध्वजवंदन नक्कीच कौतुकास पात्र ठरले आहे. या कृतीमुळे भारावून गेलेल्या या दोघींनी आज ७२ वर्षांनंतर समानतातत्त्वाचे अनुकरण करत आम्हाला समाजाने स्वीकारले असल्याची भावना व्यक्त केली. चांदणी यांनी तर आज ७२ वर्षांनंतर आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. याबाबत गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर म्हणाले की, तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. अनेकदा तृतीयपंथीयांना बघून आपण लांब जातो, त्यांना बघून रस्ता बदलतो. हेच संस्कार पुढच्या पिढीवर पण होत असतात. त्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला असून आपण करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले.
७२ वर्षांनंतर आज स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय, तृतीयपंथीयांकडून ध्वजवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:41 AM