खेड तहसील कार्यालयात तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीच्या सचिव तथा तहसीलदार खेड श्रीमती वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी,अजय जोशी व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अरुण चांभारे व अशासकीय सदस्य विद्याधर साळवे, सुजाता पचपिंड, कैलास लिंभोरे, बबनराव शिवले, सागर बनकर, राहुल कुंभार, संजय वाघमारे, दीपक थिगळे, नायब तहसीलदार मालती धोत्रे, खराडे मॅडम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरोना आपत्तीमध्ये अनेक कुटुंबीयांनी आपले कुटुंबप्रमुख गमावले आहेत. अशा कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे अशा कुटुंबांना अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टीने शासन निर्णयातील निकषांनुसार सामाजिक अर्थसहाय्य योजनेनुसार लाभ देण्याकरिता २१ ते २७ जून या कालावधीमध्ये गृहभेटी घेणे अर्ज भरून कागदपत्रे प्राप्त करणे, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे, तसेच तालुकास्तरीय समितीची बैठक घेऊन मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे हे सर्व ३० जूनपर्यंत कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.