पुणे : शहरात सोमवारी ५१ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, ७३ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ११८ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी १.६३ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसला तरी, शहरात उपचार घेणारे शहराबाहेरील २ जण दगावले आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या ९६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आतापर्यंत ३६ लाख ८० हजार ३९४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ६ हजार ६२१ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९६ हजार ६८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८३० इतकी आहे.