पुणे : बँक लिंकिंग करा अन्यथा गॅसचा पुरवठा बंद करू,असा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यात बँक लिंकिंगचे प्रमाण वाढले असून, आजअखेर जिल्ह्यात सुमारे ७३ टक्के लोकांनी बँक लिंकिंग पूर्ण केले आहे. मार्चनंतर बँक लिंकिंग न केलेल्या ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. शासनाकडून गॅस सिलिंडरचे अनुदान मिळविण्यासाठी प्रत्येक गॅस ग्राहकाला आपला एलपीजी क्रमांक व बँक खाते यांची जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक तर एलपीजी वितरकांकडे फॉर्मसह बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे, किंवा बँकांमध्ये एलपीजी क्रमांक सादर करावा लागणार आहे. गेल्या काही काळात ही जोडणी केलेल्या ग्राहकांची संख्या अत्यंत तुटपुंजी होती. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका निर्माण झाल्या होत्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी बँक लिकिंग न करणा-या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जोडणीचे काम झाले असून सध्या ७३ टक्के ग्राहकांनी आपला एलपीजी क्रमांक आणि बँक खात्यांची जोडणी पूर्ण केल्याची माहिती राव यांनी दिली. (प्रतिनिधी)
७३%गॅस सिलिंडर ग्राहकांनी केले बँक लिंकिंग
By admin | Published: February 10, 2015 11:56 PM