पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत २०१०-११ ते २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९८० कुष्ठपीडितांना ७३ लाख ४२ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. नि:समर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेंतर्गत कुष्ठपीडित अपंग व्यक्तींना दरमहा दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाकरिता २४ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची योजना महापालिकेतर्फे राबविली जाते. याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अद्यापपर्यंत ११४ कुष्ठपीडितांना २७ लाख ३६ हजार रुपयांच्या अर्थसाहाय्याचे वाटप केले. ही योजना वर्षभर खुली असून, महापालिकेच्या ४४ नागरी सुविधा केंद्रांत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऐवले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
कुष्ठपीडितांना ७३ लाखांचे अर्थसाहाय्य
By admin | Published: January 03, 2017 6:21 AM