पुणे : गुडघे दुखीसाठी हर्बल लाईफ कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करण्याच्या बहाण्याने ७३ वर्षीय वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवार पेठ परिसरात घडला आहे. याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भालचंद्र निवृत्ती कामठे (वय ७३, रा. शनिवार पेठ) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, कामठे यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. गुडघे दुखत असल्याने त्यासाठी हर्बल लाईफ कंपनीचे औषध घ्यायचे आहे असे सांगून कामठे यांना लोकेशन पाठवले. औषधे घ्यायला येतो सांगून आधी पैसे पाठवतो असे सांगत त्या व्यक्तीने कामठे यांना मोबाईल क्रमांकावर स्कॅनर पाठवले. कामठे हे त्यावेळी घरातील कामाच्या गडबडीत असल्याने पाठवलेले स्कॅनर स्कॅन केले असता कामठे यांच्या बँकेच्या खात्यामधून ४ लाख ७४ हजार २४८ रुपये कामठे यांच्या बँक खात्यातून कट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कामठे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने हे करत आहेत.