लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ससून रुग्णालयासह औंध रुग्णालय, सर्व जिल्हा ग्रामीण रुग्णालय, उपरुग्णालय, महिला रुग्णालयांसह २६ सरकारी रुग्णालयांची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ७ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ‘शाॅर्टसर्किट’ होऊन दुर्घटना झाल्या. यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेश दिले.
शहर आणि जिल्ह्यातील ७३४ खासगी व सरकारी रुग्णालयांपैकी आतापर्यंत ७०७ रुग्णालयांनी फायर ऑडिट पूर्ण केले आहे. अद्यापही २८ रुग्णालये बाकी आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कॅन्टोन्मेंट हद्दीसह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या खासगी रुग्णालयांनी तथा सरकारी रुग्णालयांनी आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना कलम ३ पोटकलम मध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे, रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधक उपाययोजनांचे अग्निशमन लेखापरीक्षण मान्यताप्राप्त अ, ब, किंवा क या फायर लायसन्स एजन्सीकडून करून घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार सर्व आवश्यक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत ठेवाव्यात, लेखापरीक्षणातील त्रुटींची पूर्तता त्वरित पूर्ण करावी, असे आदेश समितीने दिले.
या फायर ऑडिटमध्ये ‘ससून’सह जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामीण रुग्णालये, जिल्हा उपरुग्णालय आणि महिला रुग्णालयात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तातडीने सर्व सरकारी रुग्णालयांची फायर सिस्टिम अद्ययावत करण्याचे आदेश दिले. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल ७ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
------