पुणे : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात ७५ देवराई प्रकल्प पूर्ण करून हा दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई आणि रघुनाथ ढोले यांच्या देवराई फाउंडेशनतर्फे हा उपक्रम झाला. दिवे येथील ‘आरटीओ’ परिसरात ७५ वी देवराईस रविवारी प्रारंभ झाला.
अनेक वर्षांपासून देशी रोपे तयार करून मोफत देणाऱ्या रघुनाथ ढोले यांनी यासाठी मेहनत घेतली. त्यांनी सयाजी शिंदे यांच्यासोबत देवराईचे स्वप्न चार वर्षांपूर्वी पाहिले होते. रघुनाथ ढोले यांनी ३६ वर्षांपूर्वी दोन रोपे लागवड करून वृक्षारोपणाला सुरवात केली. जवानांना मानवंदना देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आणि ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पूर्णही केला. दिवे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संतोष झगडे यांनी या उपक्रमाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
ढोले यांनी आतापर्यंत १४ लाख ६८ हजार ९१५ पिशव्यांमधून रोपं लावून ती दान केली आहेत. तर नर्सरी उभारून त्यात ८ लाख ७३ हजार रोपं बनवली. असे एकूण सुमारे २३ लाख ४१ हजार रोपांची लागवड राज्यभरात झाली आहे. राज्यभरात जंगलात फिरून त्यांनी दुर्मिळ झाडांच्या बिया जमा केल्या आणि त्यापासून रोपं बनवली. कोणत्याही गावात मानवनिर्मित देवराई तयार करायची असेल, तर ते मार्गदर्शन आणि रोपं मोफत देतात. राज्यात २१ घन वन केले असून, २२ ठिकाणी नर्सरीदेखील उभारल्या आहेत. या कामासाठी त्यांना अनेक संस्थांनी मदत केली आहे.
—————————————
एक एकरात १२०० रोपांची लागवड
भारतमातेचा ७५ वा स्वातंत्र्यदिन रविवारी झाला. त्यानिमित्त पूर्वसंध्येला सासवड येथील आरटीओ कार्यालयाच्या जागेत देवराई करण्याचा निर्धार झाला. त्यानुसार वृक्षारोपण करण्यात आले. दिवे आरटीओ येथील जागेत ११५ प्रजातींची सुमारे ६०० वृक्ष एक एकरात लावली आहेत. असे दोन प्रकल्प असून, दोन्ही मिळून १२०० रोपं लावली. या प्रकल्पासाठी देवराई प्रकल्पासोबत संकल्पतरू फाउंडेशन, रोटरी क्लब, आर्य वैश्य संस्था आदींनी मदत केली आहे.
—————————————
राज्यात ७५ मानवनिर्मित देवराई तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते, ते स्वातंत्र्यदिनी पूर्ण झाले. ७३ देवराईचे काम यापूर्वी पूर्ण झाले होते. त्यानंतर भुसावळ येथे एक आणि दिवे येथे दोन देवराई तयार केल्या. त्यामुळे ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ७५ देवराई पूर्ण केल्या.
- रघुनाथ ढोले