पुणे : संगमवाडी, नगर रस्त्यापाठोपाठ आता औंध ते पुणे मनपा, संगमवाडी ते मनपा आणि बोपोडी ते मनपा अशा १६ किलोमीटर लांबीच्या ३ नवीन मार्गांना स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या १६ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीवर ७५ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यास स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.महापालिकेकडून उड्डाणपूल, रस्ते यांसह अनेक प्रकल्पांवर सल्लागार नेमून कोट्यवधी रुपये खर्च करण्याच्या प्रकारावर स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार टीका करण्यात आली असतानाही पुन्हा बीआरटी प्रकल्पाच्या १६ किमी रस्त्यासाठी सल्लागार कंपनी नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बीआरटीच्या ३ मार्गांसाठी सल्लागार म्हणून अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली. सध्याच्या वाहतुकीचा अभ्यास करणे, अस्तित्वातील बीआरटीएस मार्गाचा अभ्यास करून नियोजन आराखडे तयार करणे, चौकांचे डिझाईन, सिग्नल व्यवस्था, निविदा प्रकिया राबविणे आदी कामे या सल्लागार कंपनीकडून केली जाणार आहेत. महापालिकेचा बीआरटी सेल असताना आखणी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीआरटी सल्लागारांसाठी ७५ लाख रुपयांची उधळपट्टी
By admin | Published: March 30, 2016 2:15 AM