पुणे : गेल्या आठवड्यापासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठयाने पंचाहत्तरी ओलांडली आहे.सध्या धरणात ७७.६८ टक्के पाणीसाठा आहे. अर्थात जुलै मध्यातच भरपूर पाऊस पडल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.धरण भागात पडणाऱ्या पावसामुळे भात लावणीही वेग आला आहे. या धरण साखळीवर पुणे शहराचे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन असल्यामुळे शहरानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. या आठवड्यात सुरुवातीला सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आजही २५६८क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
धरण परिसरात पाऊस सुरु असल्याने अनेकांनी शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरण परिसराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पानशेत, खडकवासला भागात चारचाकी गाड्यांची गर्दी होत असून खाद्य पदार्थ विक्रीच्या प्रत्येक स्टोलवर गर्दी होत आहे.