राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी आज प्रचंड उत्साहाने मतदान केले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ७५.८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.नगर परिषदेच्या १८ प्रभागांसाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. एकूण १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात होते. एकूण १९,०७० मतदारांपैकी १४,४५९ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची टक्केवारी ७५.८ इतकी झाली. सर्वांत जास्त मतदान प्रभाग क्रमांक १ मध्ये ८७. ८ टक्के झाले, तर सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक ५ मध्ये ६६.३ एवढे झाले.मोठ्या प्रमाणात मतदान होऊनही, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय मगर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील हजर राहून परिस्थिती हाताळत होते.सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये १५.२५ टक्के मतदान झाले. दुपारी दीडपर्यंत ४८.७९ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले. कडक ऊन आणि प्रचंड उकाडा यांमुळे दुपारी मतदानाचा वेग मंदावला. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाचा वेग किंचित कमी झाला. साडेतीनपर्यंत ६३.३६ टक्के मतदान झाले. त्यानंतर ४ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे उमेदवार धास्तावले. पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. या काळात मतदार घरातून बाहेर पडू शकले नाहीत. पाऊस उघडल्यानंतर मात्र पुन्हा मतदारांच्या रांगा लागल्या. उर्वरित मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी धावपळ केली. शेवटची आकडेवारी हाती आल्यावर सर्वच केंद्रांवर चांगले मतदान झाल्याचे लक्षात आले. (वार्ताहर)
राजगुरुनगरसाठी ७५.८ टक्के मतदान
By admin | Published: April 23, 2015 6:30 AM